ंमुंबई, ता. 26 : जागावाटपाच्या दगडावर आपटून रिपब्लिकन युनाटेडचे फुटलेले जहाज, "शेकाप'चे रायगडात शिवसेनेशी असणारे गुफ्तगु तर अन्य घटक पक्षांचे कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी असलेले लागेबांधे यामुळे "प्रस्थापित राजकीय पक्षांच्या विरोधात रिडालोसने विधानसभा निवडणुकीत दिलेली ललकारी निष्प्रभ ठरण्याची शक्यता आहे.
हातघाईच्या लढाईत अंतिम टप्प्यात स्थानिक तडाजोडींचा धोकाही रिडालोसला आहे.
कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी आणि शिवसेना भाजप या प्रस्थापित पक्षांच्या विरोधात लढा देण्यासाठी राज्यात रिपब्लिकन डावी लोकशाही समितीच्या झेंड्याखाली 20 पक्षांची मोट बांधण्यात आली. डाव्या पक्षांच्या तिसऱ्या आघाडीत रिपब्लिकन युनायटेड सामिल होऊन "रिडालोस"च्या झेंड्याखाली सर्वजण एकत्रित आले. काही दिवस बळेबळेच एकत्रित नांदल्यानंतर नेतृत्वाच्या मुद्याचे रिपब्लिकन नेत्यांचे जुने दुखणे उफाळून आले व ऐक्याचे वारू प्रत्यक्ष निवडणुकीआधीच फुटले. भारिपचे नेते आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार ऍड्. प्रकाश आंबेडकर रिपब्लिकन ऐक्यात सामील न झाल्याने ऐक्य अपूर्णच होते. त्यानंतर एक- एक करत माजी आमदार टी. एम. कांबळे, डॉ. राजेंद्र गवई यांनी रामदास आठवलेंवर शरसंधान केले व बाहेरच रस्ता धरला. रिपब्लिकन ऐक्यात आता प्रा. जोगेंद्र कवाडे आणि रामदास आठवले हेच प्रमुख नेते उरले आहेत. त्यामुळे रिपब्लिकन ऐक्याचे रूपांतर कवाडे- आठवले युतीत झाले आहे. ऐक्याच्या प्रयोगाने व त्यानंतर रिडालोसच्या रूपाने झालेल्या वाटचालीमुळे आंबेडकरी जनतेत काहीसे दिलासादायक वातावरण निर्माण झाले होते. परंतु नेत्यांनी पुन्हा इतिहास जागविला आहे. त्यामुळे दलित व आंबेडकरी मतदारांचा नेत्यावरील अविश्वास अधिक पक्का होण्यास हातभार लागला आहे. ऐक्यातून बाहेर पडलेल्या गटांची फारशी ताकद नसली तरी त्यांच्या बाहेर पडण्यामुळे जनतेत गेलेला संकेत रिब्लिकन चळवळीला घातक ठरणार आहे. शिवाय आंबेडकर, कांबळे, आठवले वेगळे लढल्याने मतांचे विभाजन अटळ आहे.
"शेकाप"चे शिवसेनेशी गुफ्तगू
आमचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही असे शेकापचे ज्येष्ठ नेते एका बाजूला सांगत आहेत. तर दुसऱ्या बाजूला शेकाप आणि शिवसेनेत रायगड मध्ये स्थानिक पातळीवर जागा वाटपातही तडजोडी झाल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत शेकापने केलेल्या मदतीची परतफेड शिवसेना रायगडातील चार मतदारसंघात शेकापला मदत करून करणार आहे. तर शेकापनेही शिवसेना लढत असलेल्या श्रीवर्धन, महाडमध्ये आपले उमेदवार उभे न करता मदत करण्याचे ठरवले आहे. शेकाप हा रिडालोसचा प्रमुख घटक पक्ष आहे. आमदार कपिल पाटील यांनी मागितलेल्या 9 पैकी बहुतांशी मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यामुळे पाटील यांची ही "विलासी" खेळी असल्याची चर्चा घटक पक्षातच सुरू आहे. राजू शेट्टी यांचे पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस "लक्ष्य" आहे. राष्ट्रवादीला मात देण्यासाठी शेट्टी स्थानिक तडजोडी करताना प्रस्थापित राजकीय पक्षांचीच मदत घेण्याची शक्यता आहे. एकूणच प्रस्थापितांना विरोध करणारे प्रस्थापितांच्याच भोवती रेंगाळत आहे. त्यामुळे तिसऱ्या आघाडीला मतदारांचा किती प्रतिसाद देणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment