ंमुंबई, ता. 10 : विधानसभा निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असून, राज्यात प्रचार शिगेला पोहचला आहे. राजकीय नेत्यांबरोबरच अभिनेतेही आता प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले असून, त्यामुळे एरवीच्या "ब्लॅक अँड व्हाईट' प्रचारसभांमध्ये चांगलाच रंग भरला आहे.
निवडणुकांच्या रणधुमळीत गर्दी खेचण्यासाठी प्रसिध्द अभिनेत्यांना प्रचारात उतरविण्याचा फंडा नवा नाही. यावेळीही मराठी आणि हिंदी चित्रपटातील अनेक अभिनेते कॉंग्रेस आघाडी, युती आणि "रिडालोस'चा झेंडा घेऊन शेवटच्या टप्यात प्रचाराच्या रणमैदानात उतरले आहेत. कॉंग्रेसकडून सर्वाधिक स्टारप्रचारक मैदानात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा प्रचार करणारा सलमान खान यावेळीही कॉंग्रेसच्या मदतीला धावला आहे. "जवॉ दिलोंकी धडकन' असलेल्या सल्लूमियॉंने मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, लातूर आदी ठिकाणी रोड शो करून मतदारांना आकर्षित केले. सोलापूर येथे प्रणिती शिंदे, तसेच औरंगाबाद येथे राजेंद्र दर्डा यांच्या प्रचारासाठी करण्यात आलेल्या रोड शोच्यावेळी सलमानला पाहण्यासाठी आलेल्या गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला.
ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी आपल्या अंगावरील सोन्याचे वजन सावरत प्रचारात उतरले आहेत. मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांचा प्रचार त्यांनी केला. उत्तर भारतीयांची "व्होट बॅंक' काबीज करण्यासाठी कॉंग्रेसने भोजपुरी स्टार रवी किशन यांना मुंबई प्रचारासाठी फिरविले; तर हिंदी चित्रपटात स्वतःचे स्थान निर्माण करणारा अभिनेता रितेश देशमुख याने थोरल्या भाऊ, अमितसाठी लातूरमध्ये मतदारांना साकडे घातले. औरंगाबाद मध्ये कॉंग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डांच्या प्रचारात "इक्बाल' फेम श्रेयस तळपदेने शाब्दिक गोलंदाजी करीत मतांचा जोगवा मागितला. "जली को आग कहते है...' असा डायलॉग मारत अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी युतीच्या उमेदवारांच्या प्रचारात कॉंग्रेसवर आग ओकली. शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारात ते सहभागी झाले. अभिनेत्री स्मृती इराणी, क्रिकेटपटू संजय मांजरेकर, पहिला इंडियन आयडॉल अभिजित सावंत यांनीही युतीचा झेंडा खांद्यावर घेत प्रचारात रंग भरला आहे.
नेता आणि अभिनेता असलेल्या संजय दत्तने समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यासाठी "मामू, सायकल पे वोट देना' अशी साद भिवंडीतील मतदारांना घातली. अभिनेत्री जया प्रदा, जया बच्चन आणि सुनील शेट्टी यांनीदेखील समाजवादी पार्टीच्या प्रचारात सहभाग घेतला. मराठीच्या मुद्द्यावर रणांगणात उडी घेतलेल्या मनसेच्या प्रचारासाठी अभिनेता भरत जाधव, "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' फेम सचिन खेडेकर, तसेच अभिनेत्री वर्षा उसगावकर हे स्टार कलाकार पुढे सरसावले आहेत.
नेत्यांच्या त्वेषाने कडाडणाऱ्या मुलूखमैदान तोफा आणि आपल्या उपस्थितीने गर्दी खेचणारे अभिनेते यामुळे निवडणूक ज्वर टीपेला पोहचला आहे...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment