मुंबई, ता. 10 : "रिपब्लिकन डावी लोकशाही समिती'चे घटक असलेल्या प्रमुख राजकीय पक्षांचे नेते प्रस्थापित कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना, भाजप या राजकीय पक्षांना धडा शिकविण्याची भाषा करीत आहेत; मात्र समितीमधील या नेत्यांचे याच प्रस्थापित पक्षांसोबत असलेले जुने "कनेक्शन' त्यांच्या विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत देणारे आहे. त्यामुळे मतदारांसमोर जाताना समितीची कोंडी होऊ शकते.
"रिडालोस'मध्ये सहभागी झालेल्या बहुतांश घटक पक्षांनी सत्तेच्या राजकारणासाठी एक ना अनेक वेळा कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना-भाजप यांच्याबरोबर आघाड्या- युती केल्या आहेत. हेच पक्ष या वेळी विधानसभा निवडणुकीत वेगळी भूमिका घेऊन उभे राहिले आहेत. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या विरोधात दंड थोपटताना त्यांनी आपले जुने पाश मात्र तोडलेले नाहीत! त्यामुळे या नेत्यांच्या "कथनी आणि करणी'त कुठे फरक तर नाहीना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
शेकाप-शिवसेना "दोस्ताना'
रामशेठ ठाकूर आणि शेकाप यांच्यातील राजकारणात कॉंग्रेसला रायगडमधून संपविण्याच्या ईर्षेने पेटलेल्या "शेकाप'ने श्रीवर्धन विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला मदत केली होती. त्यामुळे शिवसेनेचा विजय झाला. शिवसेना आणि शेकापचा हा "दोस्ताना' रायगड जिल्हा परिषद आणि लोकसभा निवडणुकीतही कायम राहिला. आघाडी आणि युतीशिवाय येथे कोणा एका पक्षाची डाळ शिजणार नाही. हे माहीत असल्याने शिवसेनेशी युती करण्याचे आमचे धोरण नाही, असे शेकापचे नेते वरकरणी सांगत असले, तरी या निवडणुकीतही हाच फॉर्म्युला छुप्या पद्धतीने राबविला जाण्याची शक्यता आहे. "शिवसेनेशी संबंध नाही' असे नेते बोलत असले, तरी रायगड जिल्हा परिषदेत शिवसेना- शेकाप यांचे संबंध कायम आहेत. याबाबत शेकापचे सरचिटणीस प्रा. एस. व्ही. जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, जिल्हा परिषदेची मुदत विधानसभा निवडणुकीनंतर संपत असल्याने जिल्हा परिषदेतील पाठिंबा काढला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता "रिडालोस'ची जी भूमिका तीच शेकापची भूमिका राहील, असेही ते म्हणाले.
आठवलेंनाही सत्ता सोडवेना
शिर्डीतील पराभवानंतर माजी खासदार रामदास आठवले यांनी कॉंग्रेसवर दुगाण्या झाडल्या. कॉंग्रेसला आपली ताकद दाखविण्यासाठी रिपब्लिकन ऐक्यासह तिसरी आघाडी घडवून आणली; मात्र कॉंग्रेस आघाडीच्या मंत्रिमंडळात असलेले राज्यमंत्री ऍड. प्रीतमकुमार शेगावकर यांचा तसेच महामंडळावर असलेल्या आपल्या कार्यकर्त्यांचे राजीनामे त्यांनी घेतले नाहीत. "त्यांचे राजीनामे माझ्या खिशात आहेत,' एवढेच ते सांगत राहिले. त्यामुळे रामदास आठवले हे कॉंग्रेस, राष्ट्रवादीशी संबंध ठेवून असल्याचा प्रचार करण्याची संधी भारिप व बसपच्या नेत्यांना मिळत आहे. आठवले यांनी मात्र आपण पुन्हा कॉंग्रेसकडे जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
लोकभारती- विलासराव संबंध?
"लोकभारती'चे आमदार कपिल पाटील यांचे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी घनिष्टसंबंध असल्याने त्यांच्याही भूमिकेवर "रिपब्लिकन डावी लोकशाही समिती'च्या नेत्यांनी शंका उपस्थित केली होती. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना शह देण्यासाठी प्रताप चिखलीकर यांच्यासोबत ते नांदेडमध्ये गेले होते. लोक भारतीच्या वाट्याला आलेल्या पाच पैकी तीन मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. कपिल पाटील यांच्या मदतीने आणि खासदार राजू शेट्टी यांच्यामार्फत राष्ट्रवादी कॉंग्रेसला पश्चिम महाराष्ट्रात शह देण्याची विलासरावांची खेळी असल्याची चर्चा आहे; मात्र आपले आणि विलासरावांचे राजकीय नव्हे, तर व्यक्तिगत मैत्रीचे संबंध आहेत, कॉंग्रेसच्या प्रवाहात आपण कधीच जाणार नाही, असे कपिल पाटील यांनी स्पष्ट केले आहे. एकंदरीतच "रिडालोस'मधल्या या प्रमुख घटक पक्षांच्या नेत्याचे जुने संबंध या समितीला अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.
..................
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment