Thursday, September 25, 2008
"डेस्टिनेश मार्स' हा मराठी चित्रपट राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये
अंधश्रद्धेला "बेस्ट' खतपाणी!
क्रौर्यावर माणुसकीचा विजय! धुळे दंगल
माध्यमिक शाळांतही आता सर्वशिक्षा अभियानकेंद्राचा निर्णय
पर्सेंटाईल रद्द झाल्याने सरकारवर नामुष्कीन्यायालयाची
Tuesday, September 23, 2008
राजा'ची कृपा"दिग्विजय'ला मिळाली झळाळी!
राजा'ची कृपा"दिग्विजय'ला मिळाली झळाळी!
योगेश पवार ः
मुंबई : ओसाड निर्मनुष्य वातावरण, फुटलेली तावदाने, क्षरपंजरी पडलेली चिमणी, जागोजागी लटकणारी जळमटे, भिंतीच्या उडालेल्या खपल्या व वटवाघळांचा मुक्त संचार अशा भग्नावस्थेत 20-22 वर्षे दुर्लक्षित पडलेली लालबागची दिग्विजय टेक्स्टाईल मिल गेल्या काही दिवसांपासून गणेशभक्तांनी अक्षरश: गजबजून गेली आहे. मिलच्या आवारात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईने तिला पुन्हा एकदा नवी झळाळी प्राप्त झाली आहे. "लालबागच्या राजा'चीच ही किमया म्हणावी लागेल.अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त "लालबागच्या राजा'च्या दर्शानासाठी भक्तांची अलोट गर्दी उसळली आहे. सुमारे एक कोटी भाविक दर्शनासाठी येतील, असा अंदाज आहे. भक्तांचा हा महापूर आवर घालण्यापलीकडे असल्याची जाणीव झाल्याने त्यांच्या सोयीसाठी यंदा "लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा'ने शेजारच्या दिग्विजय टेक्स्टाईल मिलची अर्धी जागा 10 दिवसांसाठी भाड्याने घेतली आहे. केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने ही जागा गणेश मंडळाला भक्तांच्या सोयी-सुविधेसाठी वापरण्याची परवानगी दिली आहे. केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी या कामी पुढाकार घेतला. शिवसेनेचे खासदार मोहन रावले यांनी ही जागा तात्पुरत्या स्वरूपात मिळविण्यासाठी विशेष परिश्रम घेतल्याचे मंडळाचे कार्यकर्ते बाळासाहेब कांबळे यांनी सांगितले.एकेकाळी शेकडोंच्या संख्येने गिरणी कामगार "दिग्विजय मिल'मधून बाहेर पडत असत; नंतर मात्र चिटपाखरूही या जागी फिरकेनासे झाले. त्यामुळे सतत गजबजाट असलेली ही मिल एकदम ओकीबोकी झाली. या वर्षी मात्र "लालबागच्या राजा'मुळे तिचे भाग्य उजाळले आहे. "राजा'च्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मिलची अर्धी जागा घेण्यात आल्याने, काही काळ का होईना "दिग्विजय'चे आवार पुन्हा एकदा माणसांनी फुलून गेले आहे. "राजा'च्या मुखदर्शनाची रांग मिलच्या आवारातून काढण्यात आली असून, मिलच्या जागेची खास सजावट करण्यात आली आहे. मिलच्या आवारात विद्युत रोषणाई करण्यात आल्याने संपूर्ण परिसर झगमगून गेला असून, मिलला एक नवे रूप आले आहे. सर्वत्र कार्पेट पसरण्यात आले असून, पिण्याच्या पाण्याचीही सोय करण्यात आली आहे. जागोजागी रेलिंग बांधण्यात आल्या आहेत. एक्झॉस्ट फॅन आणि सीसी टीव्हीही लावण्यात आले आहेत. एकाच वेळी सहा ते सात हजार गणेशभक्त या मार्गातून "राजा'च्या दर्शनासाठी पुढे सरकत आहेत. भक्तांच्या रांगेतून "राजा'च्या दर्शनासाठी आलेला आणि पुढे पुढे सरकणारा एखादा मिल कामगार "पुन्हा सोन्याचे दिवस येऊ दे रे गणराया' असे साकडे "राजा'स नक्कीच घालत असेल.चौकट80 च्या दशकापासून दुर्दशा1980 पासून मुंबईतील गिरण्यांना घरघर लागली आणि कालांतराने गिरण्या बंद पडल्या. गिरणी कामगार देशोधडीला लागले. वस्त्रोद्योग मंत्रालयाने एकूण 24 गिरण्यांपैकी 15 गिरण्या बंद करण्याचा निर्णय घेतला; त्यात "दिग्विजय'चा समावेश होता. कामगारांची देणी देण्यात आल्यानंतर 2004 मध्ये ही मिल बंद करण्यात आली; परंतु तिच्या दुर्दशेला खरी सुरुवात 80 च्या दशकापासूनच झाली, अशी माहिती गिरणी कामगारनेते दत्ता इस्वलकर यांनी दिली.
बालमूर्तिकारचिमुकल्या हातांनी साकारतायत बाप्पा
योगेश ...
बालमूर्तिकारचिमुकल्या हातांनी साकारतायत बाप्पा
मुंबई : बारा दिवस भक्तांच्या घरचा पाहुणचार घेऊन गणपतीबाप्पा गावाला गेले असले, तरी लहानग्यांच्या हातातून ते पुन्हा आकार घेऊ लागले आहेत. चर्नी रोडमधील जवाहर बालभवनात शाडूच्या मातीतून आपल्या आवडत्या बाप्पाची मूर्ती चिमुकले हात साकारत आहेत. मूर्ती घडविण्याची त्यांची धडपड पाहिली, की मुलांतील कलागुणांना वाव दिल्यास त्यांची अभिरुची जाणून घेणे अवघड गोष्ट नसल्याची प्रचीती येते.सुट्टीच्या दिवसांत बालभवन लहान मुलांनी अक्षरश: गजबजून जाते. चित्रे काढण्यात दंग असलेले, संगीत शिकण्यात रमलेले वा शिल्पकलेत गढून गेले विद्यार्थी आपणास या ठिकाणी पाहावयास मिळतात. गणेशोत्सवाची धामधूम नुकतीच संपली असल्याने सध्या या उत्सवाचे रंग विद्यार्थ्यांच्या कलेत दिसत आहेत. विशेष म्हणजे, "लालबागचा राजा', "गिरगावचा राजा', "खेतवाडीचा गणपती', "गणेश गल्लीचा राजा' आदी मुंबईतील प्रसिद्ध गणपती लहानग्यांच्या हाताने शाडूच्या मातीतून आकार घेत असल्याचे पाहावयास मिळत आहेत. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा... त्याला घडवावे तसे ते घडत जाते असे म्हणतात; मात्र बालभवनात येणारी मुले स्वत: घडता घडता मातीच्या गोळ्याला आपल्या मनातील आकार देण्याचा करीत असलेला प्रयत्न कौतुकास्पदच म्हणायला हवा. हातात असलेला मातीचा गोळा शेकडो वेळा तोडून त्यातून आपल्या मनाजोगी मूर्ती बनविण्याचा मुलांचा खटाटोप पाहता भावी शिल्पकार यातून निर्माण होतील याची शाश्वती येते.पेडर रोड, वाळकेश्वर आदींसारख्या उच्चभ्रू वसाहतींतील मुलांसह ठाणे, रायगड जिल्ह्यांतील ग्रामीण भागांतील मुले बालभवनात मूर्ती बनविण्याच्या ओढीने एकमेकांत मिसळून जात आहेत. त्यांच्या हाता-पायांना, गालांना आणि कपड्यांना लागत असलेल्या शाडूच्या मातीने अवघा रंग एक होऊन जात आहे.शनिवार आणि रविवार असे वर्षभर "बालभवना'त प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. दीर्घ सुट्टीच्या कालावधीत दिवसभर विद्यार्थ्यांना कलेबाबत प्रशिक्षण देण्यात येते.गणेशोत्सवादरम्यानच्या काळात आपल्या कुटुंबीयांसोबत पाहिलेले गणपती साकारण्याचा प्रयत्न मुले "बालभवना'त करीत आहेत. आम्ही त्यांना जुजबी मार्गदर्शन करतो. शिकवण्यापेक्षा त्यांना जे करता येते ते करू देण्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहित करतो, अशी माहिती शिल्पकला निदेशक एस. आर. पाठारे यांनी दिली. अभिरुची जाणण्याचा प्रयत्नपालकांना आपल्या मुलाने डॉक्टर-इंजिनियर वा चित्रकार व्हावे असे वाटत असले, तरी या ठिकाणी आलेला मुलगा सर्वात जास्त वेळ कोणत्या कलेसाठी घालवितो, यावरून त्याची अभिरुची जाणण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यांच्या पालकांना त्याबाबत माहिती दिली जाते, असे कार्यक्रम अधिकारी प्रतिभा थरवळ यांनी सांगितले. 4 ते 16 वयोगटातील मुलांसाठी 22 रुपये एवढे नाममात्र वार्षिक प्रवेश शुल्क आकारण्यात येत असल्याचेही त्या म्हणाल्या.
अंधश्रद्धेविरुद्ध 1100 शिक्षण संस्थांचा एल्गार
"जादूटोणाविरोधी विधेयका'चे कायद्यात रूपांतर करायचे की नाही, या प्रश्नाचे भिजत घोंगडे सरकारदरबारी पडले असले, तरी राज्यभरातील अकराशे शिक्षण संस्था येत्या 27 आणि 28 सप्टेंबर रोजी जळगाव येथे होणाऱ्या राज्यव्यापी परिषदेत "वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अंधश्रद्धा निर्मूलन शैक्षणिक जाहीरनामा' स्वीकारून एका नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवणार आहेत. अंधश्रद्धेविषयी सरकारची भूमिका बोटचेपेपणाची असली, तरी शिक्षण क्षेत्राने मात्र आता त्याविरुद्ध निर्णायक एल्गार पुकारला आहे.देशाच्या शिक्षण क्षेत्रातील हा पहिला अभिनव प्रकल्प असल्याची माहिती "महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती'चे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. माजी शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात येणार आहे; तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील भूषविणार आहेत. माजी मंत्री सुरेश जैन या वेळी उपस्थित राहणार आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. बी. पाटील या परिषदेचे स्वागताध्यक्ष आहेत. "महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळा'चे अध्यक्ष देवीसिंह शेखावत 28 सप्टेंबर रोजी समारोप समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवितील. या वेळी त्यांच्या स्वाक्षरीने हा जाहीरनामा मंजूर करून प्रसारित केला जाईल. शालेय शिक्षणमंत्री वसंत पुरके, उद्योजक भवरलाल जैन हे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा जाहीरनामा त्यानंतर राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना सादर केला जाणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी चर्चासत्रात या जाहीरनाम्याची रूपरेषा पुणे येथे फेब्रुवारी महिन्यात निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर हा मसुदा राज्यातील शिक्षण संस्थांना विचारार्थ पाठविण्यात आला होता. अनेक संस्थांकडून त्याला अनुकूलता मिळाली आहे. जळगावच्या परिषदेत तो स्वीकारल्यावर प्रत्यक्ष कृतीबाबत आखणीही केली जाणार आहे.कोट....."" भारतीय राज्यघटनेनुसार वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मूल्यशिक्षणातही त्याचा समावेश आहे. प्रत्यक्षात अंधश्रद्धांचा प्रभाव साऱ्याच लोकांवर पडला आहे. दृक्श्राव्य माध्यमावरील कार्यक्रम त्यामध्ये भर घालीत आहेत. यामुळे समाज आणि व्यक्ती दैववादी बनते. हा महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा आणि विज्ञानयुगाचा पराभव आहे. त्यामुळे हा जाहीरनामा संविधानातील तरतूद व शैक्षणिक धोरणाच्या आधारे विचारांची ठोस मांडणी करणारा असून तो महात्मा फुलेंच्या सत्यशोधन विचारांचे फलोचित रूप आहे.''- नरेन्द्र दाभोळकर, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती.