Friday, August 28, 2009
गोष्ट छोटी डोंगराएवढी' पाहून राष्ट्रपतीही हेलावल्या
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. यावेळी देवीसिंह शेखावत उपस्थित होते. ठाकरे कुटुंबीयांनी राष्ट्रपतींशी विविध विषयांवर चर्चा केली. तसेच राष्ट्रपती भवनाची पाहणी करून स्नेहभोजन केले. सायंकाळी राष्ट्रपतींसाठी "गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रपतींसह, उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य आणि तेजस, उद्धव यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर आणि चित्रपटातील कलावंत मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, नागेश भोसले यावेळी उपस्थित होते.
"गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटातील शेतकऱ्यांची कथा पाहून राष्ट्रपती आणि उद्धव ठाकरेही क्षणभर हेलावले. केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावर अधिक लक्ष देण्याची गरज राष्ट्रपतींनी चित्रपट पाहिल्यानंतर व्यक्त केली, असे चित्रपटातील कलावंतांनी सांगितले.
........
जाणार मंडलिक कुणीकडे?
डाव्या लोकशाही आघाडीने लोकसभा निवडणुकीत खासदार सदाशिवराव मंडलिक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला होता. तिसऱ्या आघाडीच्या पाठिंब्यावर दोन्ही खासदार निवडून आले. त्यामुळे तिसऱ्या आघाडीचे नेते आपल्या संख्याबळात मंडलिकांना नेहमीच मोजत आले आहेत. मंडलिक स्वतः डाव्या आघाडीच्या बैठकांना उपस्थित राहिले नाहीत, तरी राजू शेट्टी यांनी त्यांना तिसऱ्या आघाडीत आपल्यासोबत ठेवण्याची हमी घेतली होती. त्यांना तिसऱ्या आघाडीत आणण्यातही राजू शेट्टी यांची महत्त्वाची भूमिका होती.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंडलिक आणि शेट्टी यांचे फारसे चांगले संबंध उरलेले नाहीत; मात्र मंडलिक तिसऱ्या आघाडीतच असल्याचे सांगून खासदार राजू शेट्टी आपली बाजू सावरून घेत आहेत. आपल्या वाट्याला येणाऱ्या विधानसभेच्या जागा मंडलिक यांना देण्याची तयारी शेट्टी यांनी आघाडीच्या बैठकीत दाखविली आहे;
मात्र मंडलिक यांनी विधानसभा निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह युतीसोबत जाण्याच्या विचार सुरू केला आहे. त्यामुळे तिसरी आघाडी संभ्रमात सापडली आहे. मंडलिक यांच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी आणि तिसऱ्या आघाडीचे नेते काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
.......
रिपब्लिकन डावी लोकशाही समिती स्थापन
मुंबई, ता. 24 : आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडी आणि शिवसेना - भाजपला टक्कर देण्यासाठी डावे पक्ष आणि रिपब्लिकन ऐक्यात सामील सर्व गटांसह सुमारे 20 पक्षांची मोट बांधून "रिपब्लिकन डावी लोकशाही समिती' नावाची जंबो आघाडी स्थापन करण्यात आली आहे. या आघाडीत आज आमदार कपिल पाटील, अबू आझमी सहभागी झाले. विधानसभेच्या 288 जागा लढविण्याचा निर्णय आघाडीच्या नेत्यांनी बैठकीत घेतला. मात्र जागावाटपाबाबत कोणताही निर्णय झाला नाही.
दुष्काळ, महागाई, भारनियमन, दलित अत्याचार, सच्चर समितीच्या अहवालाची अंमलबजावणी हे निवडणुकीतील प्रचाराचे प्रमुख मुद्दे राहतील, असे आघाडीच्या नेत्यांनी जाहीर केले. जागावाटपाबाबत मात्र आजच्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही. रिपब्लिकन डाव्या लोकशाही समितीत "रिपब्लिकन ऐक्य' कायमस्वरूपी राहील, अशी ग्वाही माजी खासदार रामदास आठवले यांनी दिली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आपल्याशी संपर्क साधत असले, तरी आपण मात्र त्यांच्या संपर्कात नाही. आपण कोणत्याही स्थितीत कॉंग्रेससोबत जाणार नाही. निवडणुकीत "रिपब्लिकन'ची ताकद कॉंग्रेसला दाखवून देऊ, असे आठवले यांनी सांगितले. सत्ताधारी भ्रष्टाचारी झाले आहेत, विरोधी पक्षाचा त्यांच्यावर अंकुश नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला तिसरी आघाडी हा सक्षम पर्याय असेल, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले; तर अबू आझमी यांनी ही समिती राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला.
रिपब्लिकनचा पगडा
तिसऱ्या आघाडीवर रिपब्लिकन पक्षाचा पगडा आहे. आघाडीच्या नावात रिपब्लिकनचा समावेश करण्याचा आग्रह नेत्यांनी धरला. त्यामुळे आघाडीचे नाव बदलण्यात आले. त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाने जास्तीत जास्त जागांचा आग्रह धरला आहे. तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री हा रिपब्लिकनचा असेल, असे डॉ. राजेंद्र गवई यांनी सांगितले. रामदास आठवले आणि डॉ. गवई दोघांनीही मुख्यमंत्रिपदाची इच्छाही प्रदर्शित केली.
...तरच आंबेडकरांना घेऊ
ऍड्. प्रकाश आंबेडकर रिपब्लिकन ऐक्यात सामील झाल्याशिवाय त्यांना स्वतंत्र पक्ष म्हणून तिसऱ्या आघाडीत प्रवेश दिला जाणार नाही, असे नेत्यांनी स्पष्ट केले. डाव्या नेत्यांनी त्यांना आघाडीत घेतल्यास आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, अशी धमकी आठवले यांनी दिल्याने नेत्यांनी ही भूमिका घेतल्याचे कळते. दरम्यान, राज्यातील आघाडी सरकारमधील राज्यमंत्री प्रीतमकुमार शेगावकर यांच्या राजीनाम्याबाबत मात्र आठवले यांनी टोलवाटोलवीलीची उत्तरे दिली.
आघाडीत आमदार हितेंद्र ठाकूर यांना घेण्याची डाव्या नेत्यांची इच्छा होती; मात्र आमदार कपिल पाटील, डॉ. कुमार सप्तर्षी व राजू शेट्टी यांनी ठाकूर यांच्या समावेशास विरोध केला.
(चौकट)
संयुक्त मेळावा सप्टेंबरमध्ये
येत्या 12 सप्टेंबर रोजी तिसऱ्या आघाडीच्या सर्व घटक पक्षांचा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. या वेळी शक्तिप्रदर्शन करण्यात येईल.
(चौकट)
आघाडीतील घटक पक्ष
शेकाप, माकप, भाकप, रिपब्लिकन ऐक्य, जनता दल सेक्युलर, समाजवादी जनपरिषद, समाजवादी पक्ष, सोशालिस्ट फ्रंट, लोकभारती, राष्ट्रीय समाज पक्ष, लोक संघर्ष मोर्चा, लोक राजनीती मंच, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष.
डावे आणि आरपीआयमध्ये जागांसाठी रस्सीखेच
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (युनायटेड), डावी लोकशाही आघाडी आणि परिवर्तन समिती यांच्यात सामील असणाऱ्या गटातटांचे आणि लहान लहान पक्षांची एकत्रित मोट बांधून एक जंबो आघाडी स्थापन करण्यात आली आहे. कॉंग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजप युतीला या समितीचा प्रामुख्याने विरोध राहणार आहे. येत्या 28 ते 30 ऑगस्ट या कालावधीत जागावाटपाबाबत चर्चा होणार असून समितीतील घटक पक्षांची संख्या पाहता या पक्षांचे, गटा-तटाचे समाधान करण्यासाठी नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
रिपब्लिकन पक्षाला झुकते माप
प्रत्येक पक्ष आपल्या प्रभाव क्षेत्रात लढणार असल्याने जागावाटपावरून वाद होण्याची शक्यता नाही असा, दावा नेत्यांनी केला आहे. या समितीतील रिपब्लिकन ऐक्य हा सर्वाधिक मोठा गट असल्याने जागावाटपात त्या पक्षाला झुकते माप देण्याबरोबर नेतृत्वातही संधी दिली जाणार आहे. विशेषत: जागावाटपात खरी रस्सीखेच डावी आघाडी आणि रिपब्लिकन पक्षात आहे; मात्र डाव्या नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाला त्याच्या ताकदीनुसार जागा देण्याचा विचार चालवला आहे. विधानसभेच्या एकूण 288 मतदारसंघापैकी
रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांचे अस्तित्व 201 मतदारसंघात आहे; तर 63 मतदारसंघात त्यांचा विशेष प्रभाव आहे. रामदास आठवले गटाचा 24 मतदारसंघात प्रभाव आहे; तर प्रकाश आंबेडकर यांचा 17 मतदारसंघात प्रभाव आहे. मात्र आंबेडकर यांचा पक्ष समितीत सामिल झालेला नाही; तर समाजवादी पक्षाचा ठाणे, औरंगाबाद, या ठिकाणी प्रभाव असल्याने त्यांची जागांची मागणी मर्यादित राहणार आहे. परिवर्तन मंच विशेषत: मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील जागांवर दावा करण्याची शक्यता असून डाव्या आघाडीला रायगड, विदर्भ, मराठवाडा आदी ठिकाणी जास्त जागा हव्या आहेत. या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव असल्याने या भागातील जागांवर रस्सीखेच होऊ शकते. प्रस्थापित राजकीय पक्षांना विरोध करण्यासाठी काही पक्ष आणि संघटना आघाडीत सामील झाल्या असून त्यांच्याकडून एखाद-दुसऱ्या जागेची मागणी होण्याची शक्यता आहे.
प्रमुख आघाड्यांना जागा
रिपब्लिकन डावी लोकशाही समितीत सामील झालेल्या प्रमुख आघाड्यांना त्यांच्या प्रभाव क्षेत्रानुसार जागावाटप होणार असून या आघाड्यांनी आपल्या लहान, मोठ्या सहकारी पक्षांना त्या जागा विभागून द्याव्यात, असे धोरण राबविले जाणार आहे. प्रमुख आघाड्यांनी आपले वाद आपापल्या पातळीवर सोडवावेत, यासाठी हे धोरण स्वीकारण्यात आले आहे.
.........
Tuesday, August 25, 2009
मंदीतही 80 हजार लोकांना मिळाल्या नोकऱ्या
जागतिक स्तरावर आलेल्या वित्तीय संकटामुळे भारतातही अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा मार्ग अवलंबला होता. मंदीच्या तडाख्यात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. विशेषतः खासगी सेवाक्षेत्राला मंदीचा तडाखा बसला. मंदी सुमारे दोन वर्षे टिकेल असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज होता.
राज्यात मात्र मंदीतही सप्टेंबर 2008 ते जून 2009 अखेरपर्यंत प्रथम, द्वितीय आणि तृतीय व चतुर्थ श्रेणीतील हजारो रिक्त पदे जाहिरातींच्या माध्यमातून भरण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषदेतील विविध वर्गांतील 36 हजार 334 पदांचा समावेश आहे. मंदी असली तरी सरकारने मात्र रिक्त पदांवरील नोकरभरती सुरू ठेवली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर आणि न्यायालयीन खटले निकाली निघाल्यानंतर अनेक जागा भरण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
चालू महिन्यातही शासकीय, निमशासकीय आस्थापनांतील सुमारे तीन हजार रिक्त जागांवर नोकरभरती होत असून याबाबतच्या जाहिराती गेल्या दोन महिन्यांत वाढल्या आहेत. म्हाडा, मुंबई पोलिस आयुक्तालय, एस. टी. महामंडळ, समाजकल्याण संचालनालय, अन्ननागरी पुरवठा विभाग, सहकार आणि पणन व वस्त्रोद्योग विभाग, मुंबई महानगरपालिका, राज्य शिक्षण संचालनालय, अंधेरी येथील ईएसआयसी हॉस्पिटल, नाशिक आदिवासी विभाग, भारतीय खाद्य महामंडळ आणि शासनाच्या कृषी विभागातील विविध पदांची मोठ्या प्रमाणावर भरती होत आहे.
मंदीच्या छायेखाली असलेल्या बॅंका आणि वित्तीय संस्थांतही नोकरभरती सुरू झाली असून स्टेट बॅंकेत 11 हजार पदे भरली जाणार आहेत. बॅंक ऑफ इंडिया आणि एस. बी. आय. बॅंकेतही भरती होणार आहे. मंदीचे सावट दूर होत असल्याने साऱ्यांनीच सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
...........
Tuesday, August 18, 2009
स्वाइन फ्लूचा राजकीय पक्षांनाही दणका

Thursday, August 13, 2009
कोकणाने आता बदलायला हवे !

..................
योगेश पवार
Monday, August 3, 2009
अण्णा आणि आबांमधील दुरावा संपला

मुंबई, ता. 27 : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यात निर्माण झालेला दुरावा अखेर दूर झाला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी साथ न दिल्यामुळे आपण गृहमंत्री असताना पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील आरोपींचा तपास लागला नाही, अशी खंत पाटील यांनी आपली भेट घेऊन व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्याबाबत माझ्या मनात कसलीही नाराजी नाही, असे अण्णा हजारे यांनी आज पत्रकारांना सांगितले. पवनराजे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी तीन वर्षे लागली. या काळात आर. आर. पाटील गृहमंत्री असतानाही या प्रकरणातील आरोपी सापडू शकले नाहीत. ते पायउतार झाल्यानंतर या प्रकरणात राष्ट्रवादीतून काढून टाकण्यात आलेल्या माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे नाव आले. तसेच अण्णा हजारेंच्या हत्येच्या सुपारीचा कटही उघड झाला. यावरून आर. आर. पाटील व अण्णा हजारे यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. याबाबत अण्णांना आज पत्रकारांनी विचारले असता त्यांनी, "आपल्यात व आर. आर. पाटील यांच्यात कसलाही दुरावा नाही', असे स्पष्ट केले. येत्या विधानसभा निवडणुकीत स्वच्छ चारित्र्याचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत; मग उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याच्या प्रचारात सहभागी होऊ, असे हजारे यांनी सांगितले. खासदार राजू शेट्टी, लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांच्या पक्षासाठी व आर. आर. पाटील यांच्यासाठी प्रचार करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
(sakal)
-------------------
Sunday, August 2, 2009
निसर्गाच्या कुशीतला इतिहास

