Wednesday, December 23, 2009

वणीतून "भाकप'चा उमेदवार जाहीर

रिडालोस तोंडघशी? 15 नावांची घोषणा

मुंबई, ता. 21 : रिपब्लिकन डाव्या लोकशाही समितीचा घटक पक्ष असलेल्या भाकपने विधानसभा निवडणुकीसाठी आज 15 उमेदवारांची घोषणा केली. यवतमाळच्या कलावती बांदूरकर यांना रिडालोसने काल पाठिंबा जाहीर करीत वणी मतदारसंघ सोडण्याची तयारी दर्शविली होती; मात्र भाकपने येथून कॉ. अनिल घाटे यांना उमेदवारी जाहीर केल्याने रिडालोसच्या नेत्यांवर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे.
यवतमाळमधील वणी मतदारसंघ विदर्भ जनआंदोलन समितीच्या पाठिंब्यावर उभ्या राहणाऱ्या कलावती बांदूरकर यांना देण्यास तयार असल्याचे रिडालोसच्या नेत्यांनी काल जाहीर केले होते. रविवारी घाईघाईत त्यांना नेत्यांनी पाठिंबा जाहीर केला. वणी मतदारसंघ कलावतींसाठी सोडण्याची विनंती "भाकप'ला करू, अशी ग्वाही नेत्यांनी दिली होती; मात्र आज भाकपने वणीतून कॉ. अनिल घाटे यांना उमेदवारी जाहीर करून रिडालोस नेत्यांना तोंडघशी पाडले. कलावती यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कॉंग्रेसवर गोळी झाडण्याच्या प्रयत्नात असलेल्या "रिडालोस'च्या नेत्यांना त्यामुळे चपराक बसली असून आता ते काय भूमिका घेणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबत रिडालोस नेते आमदार जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की अजून आमची "भाकप'शी चर्चा झालेली नाही; मात्र या प्रश्‍नी तोडगा काढला जाईल.
भाकपचे आज जाहीर झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे : धामणगाव- तुकाराम भस्मे, तिवसा- साबीर हुसेन, आर्वी- प्रा. राजू गोरडे, साकोली- चंद्रशेखर टेंभुर्णी, औरंगाबाद मध्य- अशफाक सलामी, शेवगाव- ऍड. सुभाष लांडे, भोसरी कॉ. सुकुमार दामले, चोपडा- मधुकर साळुंखे, शिरपूर- रामचंद्र पावरा, कोल्हापूर शहर- दिलीप पवार, पलूस-कडेगाव- डॉ. श्रीकांत जाधव, डोंबिवली- काळू कोमास्कर, चारकोप- अखिलेश गौड, शिवडी- कॉ. नारायण घागरे.

पक्षाच्या यशासाठी "त्यांनी' त्यागली पादत्राणे!

ंमुंबई, ता. 3 : सत्ता आणि पैसा यांच्याभोवती फिरणाऱ्या राजकारणात निष्ठावंत कार्यकर्ते दुर्मिळ झालेले असतानाच, मुंबईतील एका शिवसैनिकाने व मनसैनिकाने आपापल्या पक्षाच्या यशासाठी अनवाणी फिरण्याची प्रतिज्ञा करून अद्यापही पक्षनिष्ठेची बेटं कायम असल्याचे दाखवून दिले आहे. विधानसभा निवडणुकीतील यशासाठी अनेक उमेदवारांनी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत, तर दुसऱ्या बाजूला निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नवस आणि प्रतिज्ञांचे अस्त्र घेऊन स्वतःला निवडणुकीच्या रणसंग्रामात झोकून दिले आहे.

शिवसेनेचे वरळी शाखाप्रमुख अरविंद भोसले यांनी, नारायण राणे यांचा पराभव झाल्याशिवाय पादत्राणे घालणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञाच केली आहे. महसूलमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला आव्हान देत केलेली बंडखोरी त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यांनी सांगितले, की ""कणकवलीच्या पोटनिवडणुकीत राणे यांच्या दहशतीचा सामना मी केला. त्यांची दहशत संपविण्याची शपथ मी घेतली आहे''.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मला नगरसेवकपदाची उमेदवारी देऊ केली होती; पण मी ती नाकारली. गेली दोन वर्षे मी अनवाणी फिरत आहे. माझी प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी मी कणकवलीचे तालुका संपर्कप्रमुखपद पक्षाकडे मागून घेतले.'' या वेळी कुडाळमध्ये राणे यांचा पराभव होईल आणि आपली प्रतिज्ञा पूर्ण होईल, अशी आशा भोसले व्यक्त करतात.

घाटकोपर येथील तृतीय पंथीयांच्या संघटनेचे अध्यक्ष जतिन यांनी, मनसेची सत्ता येईपर्यंत अनवाणी राहण्याची शपथ घेतली आहे. घाटकोपर (पश्‍चिम) येथील भटवाडीलगत राहणाऱ्या जतिन आणि त्यांचे गुरू रवींद्र साळवे यांना राज ठाकरे यांच्या मनसेची सत्ता यावी, असे मनोमन वाटते. जतिन यांनी राज यांची भेट घेऊन तृतीयपंथी आणि देवदासी यांच्या समस्या मांडल्या होत्या. जतीन सांगतात, की देवदासींना मासिक वेतन, रेशनकार्ड, मतदानाचा अधिकार देण्याचे आश्‍वासन राज यांनी दिले आहे. त्यामुळेच मनसेची सत्ता यावी, अशी आमची इच्छा आहे. आदिमाया शक्तीला यासाठी साकडे घातले असून, मनसेची सत्ता येईपर्यंत देवीला अभिषेक करणार नाही आणि पादत्राणे घालणार नाही, अशी प्रतिज्ञा या नवरात्रोत्सवात आपण केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
..............................

आमदार बशीर पटेल यांचा राष्ट्रवादीला रामराम

मुंबई, ता. 24 : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर आमदार बशीर पटेल यांनी आज नाट्यमय घडामोडींनंतर समाजवादी पक्षात प्रवेश केला असून समाजवादी पक्षातर्फे त्यांनी मुंबादेवी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, "सपा'चे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी 17 उमेदवारांची आज घोषणा केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमरखाडी येथील आमदार बशीर पटेल यांच्या मतदारसंघात पुनर्रचनेनंतर मोठा फेरबदल झाल्याने लगतच्या मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती; मात्र त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी न मिळाल्याने बंडाचे निशाण फडकावत ते "सपा'त दाखल झाले आहेत. कॉंग्रेसशी आघाडी असताना मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या बशीर पटेल यांच्याऐवजी नवाब मलिक मंत्री झाल्याने नाराज झालेल्या पटेल यांनी समाजवादी पक्षाला अलविदा करून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता; मात्र या वेळी जागावाटपात उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पुन्हा पक्ष बदलला आहे. मुंबादेवी मतदारसंघातून आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून ते आता तिसऱ्या आघाडीच्या पाठिंब्यावर लढणार आहेत.
समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी बशीर पटेल यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. आमदार पटेल मात्र या वेळी उपस्थित नव्हते. आझमी यांनी "सपा'च्या 17 उमेदवारांची घोषणा केली. उमेदवार पुढीलप्रमाणे : नवापूर- संजय गवळी, सिंदखेड- विजयसिंग राजपूत, बाळापूर- डॉ. सुधीर ढोले, रिसोड- शिवा बंगी, मालेगाव- चंद्रशेखर देवरे, नाशिक मध्य- सय्यद मुशीर, कोपरी- पाचपाखाडी- रामनारायण यादव, दिंडोशी- श्रीकांत मिश्रा, वर्सोवा- चंगेश मुलतानी, कालिना- अहमद आझमी, वांद्रे (पश्‍चिम)- रिझवान मर्चंट, वांद्रे (पूर्व)- शब्बीर हुसेन, भायखळा- सर्फराज आरजू, मुंबादेवी- बशीर पटेल, इंदापूर- वसंत मोरे, चिंचवड- राम शरमाळे, कसबा पेठ- अनिल अहमद यांना उमेदवारी देण्यात आली असून उर्वरित उमेदवारांची घोषणा उद्या (ता. 25) करण्यात येणार असल्याचे आझमी यांनी सांगितले.
कॉंग्रेस आघाडी सरकारने अल्पसंख्याक दलितांवर अन्याय केला आहे. त्याचा जाब राज्यातील जनता कॉंग्रेसला निवडणुकीत विचारेल, असा विश्‍वास अबू आझमी यांनी व्यक्त केला.
.......

निपाणीहून बैलगाडी ओढत त्याने मुंबई गाठली

वाळव्यातील तरुण शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन

मुंबई, ता. 18 : "निवडणुका आल्या की सत्ताधारी, राजकारणी शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्यांच्या हिताचा गमजा मारतात; मात्र शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडत नाही. शेतात जीव ओतूनही हाती काही लागत नाही. शेतकऱ्यांच्या या व्यथेकडे मायबाप सरकारने लक्ष द्यावे "इडा-पिडा टळून बळीचे राज्य यावे', अशी इच्छा आहे ती बैलगाडी ओढत नऊ सप्टेंबरला 9 वाजून 9 मिनिटांनी निपाणीहून निघालेल्या वाळवा येथील साखराळे गावच्या विजय
जाधव या तरुण शेतकऱ्याची. विजय तब्बल नऊ दिवसांचा प्रवास करून आज मुंबईत दाखल झाला.

बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या विजयने गावातच शेती करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्याचा निर्णय घेतला. चार एकर उसाच्या शेतात त्याचे कुटुंब राबते; मात्र शेतात राबूनही हाती काहीच पडत नाही. शेतीचा खर्च वाढता असल्याने व शेतमालाला हमी भाव नसल्याने तोट्याची शेती किती काळ करायची, असा प्रश्‍न त्याला सतावतोय. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या या दुरवस्थेने व्यथित झालेल्या विजयने सरकारचे आणि शेतकऱ्यांच्या नावाने सत्तेच्या सिंहासनावर बसणाऱ्या राजकारण्यांचे डोळे उघडावेत, यासाठी ही अभिनव यात्रा काढली. तंबाखू उत्पादकांच्या आंदोलनात पोलिसांच्या गोळीबाराला बळी पडलेल्या निपाणी येथील शेतकऱ्यांच्या स्मारकाला अभिवादन करून विजयने आपल्या प्रवासाला सुरवात केली. दररोज 60 ते 70 कि.मी. गाडी ओढत चालण्याचा विजयने विक्रम केला. नऊ दिवसांत त्याने तब्बल 555 कि.मी. प्रवास केला. एवढ्या प्रवासाने त्याचे पाय सुजले होते. पायाच्या तळव्याला जखमा होऊन त्यातून ओघळणारे रक्तही सुकून गेले. गाडी ओढून खांद्याला जखमा झाल्या; मात्र विजयचा निर्धार तुटला नाही. त्याने मुंबई गाठलीच; मात्र मंत्रालयाकडे जाण्यापासून पोलिसांनीही त्याला रोखून धरले. परिणामी त्याला आझाद मैदानातच बसावे लागले. त्याच्या या यात्रेस महाराष्ट्र शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे.
शेतमालाचे भाव वास्तव उत्पादन खर्चावर आधारित व डॉ. एम. एस. स्वामिनाथन समितीच्या शिफारशीनुसार 50 टक्के नफा धरून शेतकऱ्यांना मिळावेत, समितीच्या अहवालाची तत्काळ अंमलबजावणी करावी, सार्वजनिक वितरणव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याने लाभार्थींना थेट सबसिडी द्यावी, शेतकऱ्यांना खतासाठी दिली जाणारी रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात जमा करावी आदी मागण्या विजय जाधव याने कृषी खात्याच्या सचिवाची भेट घेऊन आज केल्या
..........

लोहा मतदारसंघात शह-काटशहाचे राजकारण

प्रताप चिखलीकरांना लोकभारतीची उमेदवारी

मुंबई, ता. 25 : मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे विरोधक आणि बंडखोर आमदार प्रताप चिखलीकर यांना लोकभारती पक्षाने लोहा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. लोकभारतीचे आमदार कपिल पाटील केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक असून लोकभारती व चिखलीकरांच्या आडून कॉंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याने आजी मुख्यमंत्र्याला शह दिला आहे.
लोहा येथे आज अशोक चव्हाण यांच्या गाडीवर प्रताप चिखलीकर यांच्या समर्थकांनी दगडफेक केली. विलासराव देशमुख यांचे समर्थक असणारे चिखलीकर लोहातून कॉंग्रेसतर्फे इच्छुक होते; मात्र आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडून चव्हाण यांनी चिखलीकरांचा पत्ता कापल्याची चर्चा आहे. आज लोकभारती पक्षातर्फे चिखलीकर यांनी लोहातून अर्ज दाखल केला. कपिल पाटील व चिखलीकर हे दोन्हीही मोहरे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक असून अशोक चव्हाण यांचे विरोधक आहेत. त्यामुळे लोहातील या राजकारणाला आजी - माजी मुख्यमंत्र्यांतील कुरघोडीचा वास असल्याची चर्चा आहे. लोहातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शंकरअण्णा धोंडगे लढत आहेत. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना स्थानिक पातळीवर शह देण्यासाठी कपिल पाटील यांनी चिखलीकर यांच्या पाठीशी तिसऱ्या आघाडीचे बळ उभे केले आहे. नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीतही कपिल पाटील, चिखलीकर या जोडीने चव्हाण यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.
रिपब्लिकन डावी लोकशाही समितीचा घटक पक्ष असणारा लोकभारती 12 जागा लढविणार आहे. पक्षाच्या 12 उमेदवारांची घोषणा कपिल पाटील यांनी केली. प्रताप चिखलीकर आणि वसंत जाधव या कॉंग्रेसच्या दोन बंडखोरांना लोकभारतीचे तिकीट बहाल केले. वसंत जाधव माहीम मतदारसंघातून लढणार आहेत. लोकभारतीतर्फे विक्रोळी - विनोद कांबळी, घाटकोपर (पश्‍चिम) - शरद कदम, रत्नागिरी - अभिजित हेगशेट्ये, नांदेड उत्तर - श्‍याम निलंगेकर, भोकरदन - भगवान लहाने, बेलापूर - सुकुमार किल्लेदार, वसई- दत्ता नर, करमाळा - ऍड. आजिनाथ शिंदे, बार्शी - नितीन भोसले, उल्हासनगर - साई बलराम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कपबशी चिन्हावर 55 उमेदवार लढणार
स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि लोकभारती हे तिसऱ्या आघाडीतील घटक पक्षांचे 55 उमेदवार "कपबशी' या एकाच चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे लोकभारतीच्या वतीने सांगण्यात आले.
...........

गद्दारांचो बदला घेवूक कोकणात चला

ंमुंबई, ता. 28 : शिवसेनेचो विश्‍वासघात करणाऱ्या गद्दारांचो बदलो घेवची आणि बदल घडवूची वेळ इली आसा. शिवसैनिकांनी कोकणात गावाकडे जावून लोकांका जागवूक व्हया, असे आवाहन शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी आज केले. दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईत झालेल्या सिंधुदुर्गवासीय मुंबईकर शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. महसूलमंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात देण्याचा निर्धार शिवसैनिकांनी या वेळी केला.
कोकणातील गावा-गावातील मतांवर मुंबईकर चाकरमान्यांचा पगडा मोठा असतो. चाकरमान्यांचा शब्द सहसा खाली पडू दिला जात नाही. त्यामुळेच निवडणुका आल्या, की मुंबईतले चाकरमानी क्रियाशील होतात आणि आपल्या गावाशी संपर्क ठेवून असतात. विधानसभा निवडणूक शिवसेनेसाठी कोकणात मोठे आव्हान असल्याने मुंबईकर चाकरमानी सक्रिय झाले आहेत. मुंबईकर शिवसैनिकांनी शिवसेनेला सिंधुदुर्गात पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार केला आहे. नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहशत संपली आहे. या दहशतीचा पगडा झुगारून शिवसैनिकांनी काम करावे व गद्दाराला धडा शिकवावा, असे आवाहन शिवडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख गजानन चव्हाण यांनी केले.
राणे यांच्या राजकारणाला स्थानिक जनता विटली आहे. कोकणाला उद्‌ध्वस्त करणारे खाण प्रकल्प आणल्याने लोकांच्या मनात राग आहे. लोकांना जिल्ह्यात बदल हवा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि खुद्द कॉंग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या विरोधात आहेत. या संधीचा फायदा घेऊन राणे यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
नारायण राणे यांच्या विरोधात कुडाळ मतदारसंघातून लढणारे वैभव नाईक व सावंतवाडीचे उमेदवार शिवराम दळवी यांना विजयी करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. या वेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजकारणासाठी राजकारणात
समाजकारणासाठी राजकारणात आलो आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यातील संवेदनशील माणूस पाहिला आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी राजकारणात आलो, असे माहीम येथील शिवसेनेचे उमेदवार अभिनेते आदेश बांदेकर यांनी या वेळी सांगितले. जिथे अन्याय दिसेल तेथे हा आदेश आक्रमक होईल, असे त्यांनी ठासून सांगितले.
-----------------------

आरिफ खान यांना हॅट्ट्रिकची संधी

ंमतदारसंघाच्या पुनर्रचनेत कुर्ला विधानसभा मतदारसंघाचा काही भाग मिळून चांदीवली मतदारसंघ तयार झाला आहे. पवई आय.आय.टी., पंचकुटी, हिरानंदानी, कुर्ला जरीमरी, मिलिंद नगर, असल्फा व्हिलेज आदी भाग या मतदारसंघात येतो. कुर्ला मतदारसंघातून कॉंग्रेसचे आरिफ नसीम खान दोन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. लोकसभा निवडणुकीतही येथील मतदारांनी कॉंग्रेसच्या पारड्यात मताचे दान भरभरून टाकले होते. हे पाहता, विधानसभा निवडणुकीतही येथे कॉंग्रेसचे पारडे जड राहण्याची शक्‍यता आहे.
कॉंग्रेसचे वर्चस्व असणारा कुर्ल्यातील बहुतांश भाग चांदीवली मतदारसंघात समाविष्ट झाला. त्यामुळे या वेळी आरिफ खान यांनी चांदीवलीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. 2004 च्या निवडणुकीत खान यांना एक लाख 19 हजार 612 मते मिळाली होती. एकूण मतांच्या 55.36 टक्के ही मते होती; तर शिवसेनेच्या दत्ताराम गुजर यांना एकूण मतांच्या 35.69 टक्के मते मिळाली होती. खान यांना या वेळी शिवसेनेच्या दत्ताराम गुजर या पारंपरिक उमेदवाराऐवजी नव्या दमाच्या उमेदवार चित्रा सांगळे यांचा सामना करावा लागणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्थानिक नगरसेवक दिलीप लांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला चांदीवलीत 25 हजार 368 मते मिळाली होती. शिवसेना-भाजप युतीच्या मतांच्या वाट्यात मनसे भागीदार झाल्याने युतीची लोकसभा निवडणुकीत युतीची पीछेहाट झाली. विधानसभा निवडणुकीतही याचीच पुनरावृत्ती घडेल, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत असून, त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवार सांगळे यांना बसण्याची शक्‍यता आहे. मनसे आणि शिवसेनेच्या काटाकाटीच्या राजकारणात कॉंग्रेसचा फायदा होण्याची चिन्हे आहेत. मनसेचे उमेदवार दिलीप लांडे हे स्थानिक नगरसेवक असल्याने ते लक्षणीय मते घेतील, असा अंदाज आहे.
रिपब्लिकन डावी लोकशाही समितीकडून सहदेव खटके यांनी आपले दंड थोपटले आहेत. खटके हेही नवखे उमेदवार आहेत. कॉंग्रेस आघाडीच्या विरोधात व दलित, अल्पसंख्याकांच्या हिताचा सूर आळवीत "रिडालोस'ने निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. मात्र येथील बहुसंख्य मुस्लिम, दलित मतदार हा कॉंग्रेसचा परंपरागत पाठीराखा आहे. शिवाय कॉंग्रेसचा उमेदवारही मुस्लिम समाजातील असल्याने "रिडालोस'चा कॉंग्रेसवर फारसा परिणाम होण्याची शक्‍यता दिसत नाही.
येथे बहुजन समाज पक्षानेही आपला उमेदवार दिला आहे; मात्र येथे खरा सामना कॉंग्रेस, मनसे व शिवसेना यांच्यातच होणार आहे. बसपने लोकसभा निवडणुकीत बऱ्यापैकी मते घेतली होती. त्यामुळे नसीम खान यांना बसप काही प्रमाणात उपद्रवी ठरेल, इतकेच. मतदारसंघात अनुसूचित जाती-जमातींचे सुमारे 20 हजार मतदार आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे पाच टक्के, तर अनुसूचित जमातीचे 0.61 टक्का मतदार आहेत. येथील निकाल फिरविण्याची ताकद मुस्लिम मतदारांमध्ये आहे. उत्तर भारतीय व अन्य समाजांचे मतदार मात्र तुलनेने कमी आहेत. या गोष्टी आणि कॉंग्रेसचा प्रभाव, मनसे फॅक्‍टर या बाबी लक्षात घेता, ही निवडणूक सध्या तरी कॉंग्रेससाठी सोपी असल्याचे दिसून येत आहे.
...................
चौकट :
एकूण मतदार
तीन लाख 46 हजार 866
पुरुष मतदार -
दोन लाख 7 हजार 971,
महिला -
ेएक लाख 38 हजार 835
------------------------------